महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांचा उत्साह वाढला
पिंपरी : लोकसभा व विधानसभा निवडणुकांनंतर आता महानगरपालिका निवडणुकांचे वेध लागले आहेत. राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी पुन्हा सक्रिय होण्यास सुरुवात केली आहे. अज्ञातवासात गेलेल्या या इच्छुकांनी आता जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला असून प्रभागातील मतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या अडीच वर्षांपासून ओबीसी आरक्षणाच्या न्यायालयीन तिढ्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ २२ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला होता. त्यानंतर महानगरपालिकेत प्रशासक राज सुरू आहे. मात्र, आता ही निवडणूक लवकर व्हावी, अशी मागणी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून होत आहे.
महानगरपालिका निवडणुकीत आजी-माजी नगरसेवकांसह तरुण कार्यकर्तेही आपले नशीब आजमावणार आहेत. विधानसभा निवडणुकीत रंगीत तालीम झाल्यामुळे अनेकांनी प्रभाग निश्चित केले असून काहींनी नवीन प्रभागांवर लक्ष केंद्रित केले आहे. राज्यात महायुती सरकार सत्तेवर असल्यामुळे येत्या दोन-तीन महिन्यांत निवडणुका होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ दुसऱ्या क्रमांकावर होते. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीमुळे यंदा निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे.
प्रशासक राज लागू झाल्यापासूनही आजी-माजी नगरसेवक प्रभागांमध्ये सक्रिय राहिले आहेत. गणेशोत्सव, नवरात्र आणि विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी नागरिकांशी संपर्क ठेवला आहे. तरुण कार्यकर्त्यांनीही प्रभागांत प्रभाव निर्माण करण्यासाठी कंबर कसली आहे. नागरिकांशी असलेली नाळ अधिक घट्ट करण्यासाठी इच्छुक उमेदवार आता जोमाने तयारीला लागले आहेत.
महानगरपालिका निवडणुकीत राजकीय रणधुमाळी पाहण्यास
सज्ज राहा!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.