Breaking

मंगळवार, १७ डिसेंबर, २०२४

आळंदीत पिसाळलेला कुत्रा चावल्याने ४१ जखमी

 आळंदीत पिसाळलेला कुत्रा चावल्याने ४१ जखमी

आळंदी नगरपरिषद हद्दीत पिसाळलेला कुत्रा चावल्याने (Dog Bite) आळंदीतील लहानग्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत एकूण ४१ जणांवर उपचार करण्यात आले, अशी माहिती आळंदी वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी दिली.


आळंदी येथील घाणीचे साम्राज्य असलेल्या भागीरथी नाला परिसरात ये-जा करताना गेल्या दोन दिवसांत पिसाळलेला कुत्रा चावल्याने (Dog Bite) अनेक जण जखमी झाले. यात रविवारी ( दि. १५ ) १४ जणांना कुत्रा चावल्याने तसेच सोमवारी ( दि. १६) २७ जणांना अशा एकूण ४१ जणांना कुत्रा चावल्याने नागरिकांमध्ये कुत्र्याची दहशत पसरली. जखमींमध्ये दोन लहान मुले व आठ महिला, ३१ पुरुषांचा समावेश आहे.


अखेर कुत्रा जखमी झाल्याने तसेच त्याच्या अंगावर पाणी टाकत त्यास बांधून ठेवण्याची मोठी कसरत रहिवासी नागरिकांनी केली. दरम्यान आळंदी नगरपरिषद प्रशासनास कळवण्यात आले. यावेळी पिंपरी-चिंचवड पशुवैद्यकीय विभागाच्या लोखंडी पिंजऱ्याच्या गाडीत कुत्र्यास जेरबंद करून पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले, असे आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले.


यावेळी परिसरातील नागरिक विजय गावडे, महेश पाचुंदे, नेचर फाउंडेशचे अध्यक्ष भागवत काटकर, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर आदींनी संबंधित ठिकाणी तसेच प्रशासनास कळवीत दक्षता घेत कुत्रास पिंजऱ्यात जेरबंद केले.


आळंदी शहरात विविध ठिकाणी झालेल्या कुत्रा चावण्याच्या (Dog Bite) घटनेत दोन दिवसांत एकूण ४१ जण जखमी झाले. यामुळे परिसरात नागरिकांसह भाविकांत संतापाची लाट पसरली. आळंदीतील मोकाट कुत्र्यांबाबत नाराजी पसरली आहे. प्रकरणी भाविक, नागरिकांची सुरक्षितता जोपासण्यासाठी सार्वजनिक रस्त्यावर व जागांवर मोठ्या प्रमाणात भटकणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी विविध सेवाभावी संस्थांनी तसेच आळंदी शहर भाजपचे संघटन सरचिटणीस भागवत काटकर यांनी केली आहे.


या संदर्भात आळंदी शहर भाजपच्या वतीने आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांचे लक्ष वेधण्यात येत असल्याचे भागवत काटकर यांनी सांगितले. आळंदी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेत रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी प्रशासनाने कामकाज करण्याची मागणी करण्यात आली.


आळंदीतील सार्वजनिक मोकळ्या जागा, रस्ते, इंद्रायणी नदी घाट, मरकळ रस्ता, चावडी चौक, वडगाव रस्ता, भैरवनाथ चौक आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्री फिरत असतात. यामुळे दिवसा, रात्री- अपरात्री मोकाट कुत्री नागरिकांच्या अंगावर धावून जातात.


वडगाव चौक, चावडी चौक, मंदिर परिसर, मरकळ रस्ता, शाळांच्या परिसरात फिरत असलेली मोकाट कुत्री यामुळे शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक, प्रवासी, वारकरी, भाविक यांना रहदारीला गैरसोयीचे व भीतीदायक होत आहे. अनेकांना यामुळे यापूर्वीही (Dog Bite) दुखापती झाल्या आहेत. भाविक व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आळंदी नगरपरिषदेने शहरातील मोकाट कुत्र्यांना अँटी रेबीज इंजेक्शन देण्याची गरज आहे. मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करून नागरिकांना रहदारीला त्रासदायक होणार नाही याची काळजी घेण्याची मागणी करण्यात आल्याचे भागवत काटकर यांनी सांगितले.


आळंदीतील नागरिकांकडे वैयक्तिक मालकीचे कुत्रे असतील त्यांचे गळ्यात पट्टे आणि त्यांचे पासून नागरिकांना, शेजारी यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना नगरपरिषदेने द्याव्यात. तसेच खाजगी कुत्र्यांची अभिलेखात नोंद नसल्याचे निदर्शनास आल्यावर संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. भाविक, नागरिक तसेच शालेय मुले यांचे सुरक्षिततेस प्राधान्य देऊन तात्काळ उपाययोजना न केल्यास या मागणीसाठी सनदशीर मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

प्रदक्षिणा मार्गावर भटक्या कुत्र्यांचे प्रमाण खूपच वाढले आहे. प्रदक्षिणा मार्गावरील श्री विठ्ठल रुख्मिणी चौकात शाळा आणि क्लासेस साठी ये- जा करीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर ही मोकाट कुत्री सर्रास धावून जातात. यामुळे अनेक लहान मुलेही यांची शिकार ठरतात. यामुळे प्रशासनाने वेळीच भटक्या कुत्र्यांचा (Dog Bite) बंदोबस्त करणे गरजेचे आहे.


त्याच बरोबर पाळीव कुत्र्यांना पण नागरिक रस्त्यावर, शेजारील मोकळ्या जागेत, सार्वजनिक ठिकाणी त्यांना नैसर्गिक विधीसाठी घेऊन जातात. यामुळे शेजारील लोकांना देखील याचा त्रास सहन करावा लागून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. यामुळे नागरिक मोकाट कुत्र्यांच्या त्रासास वैतागले असून नगरपरिषद प्रशासनाने याची दखल घेण्याची मागणी आळंदीत जोर धरत आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Adbox