अमित शहा यांच्या वक्तव्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन
चंद्रपूर: देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्याचा निषेध करत वंचित बहुजन आघाडीने चंद्रपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात तीव्र निदर्शने केली. या निदर्शनांमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
गृह मंत्री शहा यांनी "फॅशन म्हणून आंबेडकर, आंबेडकर असे नाव घेण्यापेक्षा देवाचे नाव घेतले असते, तर सात जन्म स्वर्गात जागा मिळाली असती," असे वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे डॉ. आंबेडकर यांचे अनुयायी आणि संविधानप्रेमी नागरिकांच्या भावना दुखावल्या असून देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
निदर्शनादरम्यान परिसर घोषणा आणि नार्यांनी दणाणून गेला होता. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करत अमित शहा यांच्याकडून राजीनाम्याची मागणी केली. "अशा बेजबाबदार व्यक्तीला गृहमंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही," असा ठाम सूर आंदोलनकर्त्यांनी मांडला.
नेतृत्व आणि उपस्थित कार्यकर्ते:
या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य कुशल मेश्राम यांनी केले. त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष सोमाजी गोंडाने, महिला आघाडीच्या अध्यक्ष कविताताई गौरकार, महानगर अध्यक्ष बंडू ठेंगरे, तनुजा रायपुरे, जयदीप खोब्रागडे यांसारखे प्रमुख नेते उपस्थित होते.
याशिवाय सतीश खोब्रागडे, सुभाष थोरात, सुनील खोब्रागडे, स्नेहल रामटेके, तनुजा रायपुरे, तसेच महिला कार्यकर्त्या आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनात उत्स्फूर्त सहभागाने परिसरात ऊर्जा निर्माण झाली होती.
पुढील आंदोलनाची घोषणा:
गृह मंत्री अमित शहा यांनी राजीनामा दिल्याशिवाय देशभर तीव्र आंदोलन चालू ठेवण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही जोरकसपणे करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या अमित शहा यांच्या निषेधार्थ हे आंदोलन भविष्यातही व्यापक होण्याची शक्यता आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.