Breaking

बुधवार, ११ डिसेंबर, २०२४

धक्कादायक प्रकार.. बांगलादेशी व्यक्तीने देहूरोडमध्ये जागा घेऊन घरही बांधले, ५०० रुपयात काढलं बनावट आधारकार्ड..!

 धक्कादायक प्रकार.. बांगलादेशी व्यक्तीने देहूरोडमध्ये जागा घेऊन घरही बांधले, ५०० रुपयात काढलं बनावट आधारकार्ड..!


म्यानमारमधून बांगलादेशात आलेल्या आणि त्यानंतर पिंपरी चिंचवड शहराशेजारी असलेल्या देहूरोड येथे राहिलेल्या रोहिंग्या व्यक्तीने बनावट आधार कार्ड काढून जागा विकत घेतली आणि घर बांधून संसारही थाटल्याचं समोर आले आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीवर जुलै महिन्यात पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतरही त्याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. मुजल्लीम खान असं या रोहिंग्या व्यक्तीचे नाव आहे.


बनावट आधार कार्ड, ८० हजारात जागा घेतली 

जुलै महिन्यात चार रोहिंग्या हे म्यानमारमधून बांगलादेशात आणि बांगलादेशातून थेट देहूरोड परिसरातील गांधीनगर येथे आले होते. हे चारही लोक पंडित चाळीत बेकायदेशीर पद्धतीने राहत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या चौघांवर कारवाई केली. मात्र याच्यातील एक असलेल्या मुजल्लीम खान यांने देहूरोड येथे ८० हजार रुपयांना जागा विकत घेतली आणि त्या जागेवर घर बांधून संसार देखील थाटला.


बनावट कागदपत्र वापरून ही जागा बेकायदेशीर पद्धतीने विकत घेतल्याची माहिती आता समोर आली आहे. मुजलीम खान याने चंद्रभागा कांबळे यांच्याकडून ८० हजार रुपयांना ६०० चौरस फूट जागा खरेदी केली आणि त्या ठिकाणी घर बांधले. 


म्यानमारमध्ये मौलानाचा कोर्स केला

मुजल्लीम खान याने म्यानमार येथील इस्लामिक संस्थेत मौलाना कोर्स पूर्ण केला आहे. तो आणि त्याची पत्नी दोन मुलांसह म्यानमार येथे राहत होता. त्यानंतर २०२२ मध्ये तो कुटुंबासह बांगलादेशात राहायला गेला. मात्र बांगलादेशात त्याला काम मिळाले नाही. त्यामुळे तो भारतात आला.


कोलकत्तामध्ये राहत असताना तिथे काम न मिळाल्याने मुजल्लीम खान थेट पुण्याला आला. पुण्यात तो बेकायदेशीर पद्धतीनं राहत होता. देहूरोड परिसरात कपडे विकण्याचा व्यवसाय करत होता. भिवंडीतून कपडे आणून पुण्यातील देहूरोड परिसरात विकायचा. 


५०० रुपयात काढलं बनावट आधार कार्ड..

भिवंडीत असताना ५०० रुपये देऊन त्याने आधार कार्ड तयार केलं आणि त्यातून त्याने भारतीय असल्याची ओळख सगळ्यांना पटवून दिली. त्यानंतर या खानने देहूरोड भागात सुपारी विकायला सुरुवात केली. याच काळात देहू रोड येथील गांधीनगर भागातील चंद्रभागा कांबळे यांच्या संपर्कात येऊन त्यांच्याकडून ८० हजार रुपयाने ६०० चौरस फूट जागा विकत घेतली आणि तिथेच घर बांधलं. 

 

मुजल्लीम खान आता जामीनावर बाहेर आहे. मात्र यातून आजूबाजूच्या देशातील लोक बेकायदेशीरपणे आणि बनावट कागदपत्रं तयार करून भारतात कसे घुसखोरी करत आहेत हे पुन्हा एकदा समोर आलं आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Adbox