गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या पोटच्या मुलाला मदत करणाऱ्या महिलेवर पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारत केले जेरबंद....
गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या पोटच्या मुलाला मदत करणाऱ्या महिलेवर पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारत केले जेरबंद . 'मोकां'तर्गत कारवाई झालेल्या लता रतन रोकडे (४२, रा. चिखली) हिला अटक करण्यात आली.
तिला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. देहूरोड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त देविदास घेवारे यांनी ही कारवाई केली.
चिखली येथे मे २०२३ मध्ये झालेल्या सोन्या तापकीर खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या करण रतन रोकडे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या टोळीतील त्याचा भाऊ ऋत्विक उर्फ मुंग्या रतन रोकडे आणि आई लता रतन रोकडे यांच्यासह टोळीतील इतर साथीदारांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जुलै २०२३ मध्ये 'मोकां'तर्गत कारवाई केली होती. तेव्हापासून लता रोकडे परागंदा होती. तेव्हापासून पिंपरी-चिंचवड पोलिस तिच्या मागावर होते. दरम्यान, तिने अटक पूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने अर्ज फेटाळला. त्यानंतर देहूरोड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त देविदास घेवारे यांनी लता रोकडे हिला १ ऑगस्ट रोजी अटक केली.
एका राजकीय पक्षाची माजी शहराध्यक्ष
लता रोकडे ही एका राजकीय पक्षाच्या महिला आघाडीची माजी शहराध्यक्ष आहे. तिने शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर तिचा मुलगा करण रोकडे याच्या गुन्हेगारी टोळीमध्ये तिचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
काय आहे प्रकरण?
चिखली येथे २२ मे रोजी दोघांनी सोन्या तापकीर याचा गोळ्या झाडून खून केला. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार करण रोकडे तसेच त्याचा भाऊ ऋत्विक उर्फ मुंग्या रतन रोकडे आणि अन्य दोघेजण फरार होते. त्यांना अटक टाळण्यासाठी तसेच पलायन करण्यासाठी लता रोकडे हिने कार खरेदी केली. त्या कारमधून करण आणि त्याचे साथीदार उत्तर भारतात गेले. त्यानंतर ती कार पोलिसांच्या हाती लागू नये यासाठी लता रोकडे हिने कार अकोला येथे लपवून ठेवली. मात्र, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हरीश माने आणि त्यांच्या पथकाने करण आणि त्याच्या साथीदारांना भारत -नेपाळ सीमेवरील गावातून पकडून अटक केली. त्यानंतर त्यांना पळून जाण्यासाठी लता रोकडे हिने मदत केल्याचे निष्पन्न झाले.
टोळी करून गुन्हेगारी
करण रोकडे याच्यावर निगडी, देहूरोड, चिंचवड, चिखली, रावेत, शिक्रापूर, बंडगार्डन पोलिस ठाण्यात ११ गुन्हे दाखल आहेत. त्याचा भाऊ ऋत्विक उर्फ मुंग्या रोकडे याच्यावर निगडी, चिखली, चाकण, निगडी, लोणीकंद पोलिस ठाण्यात ११ गुन्हे दाखल आहेत. करण याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने टोळी करून गुन्हेगारी कृत्य केले. सराईत गुन्हेगार असलेल्या आपल्या मुलांना अटक टाळण्यासाठी तसेच पळून जाण्यासाठी मदत केल्याप्रकरणी लता रोकडे हिच्यावर देखील पोलिसांनी कारवाई केली.
गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांची पाठराखण कोणीही करू नये. तसेच गुन्हेगारांना मदत देखील करू नये. तसे केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते. देविदास घेवारे, सहायक पोलिस आयुक्त, देहूरोड विभाग
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.