मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका राज्यात आघाडीवर...
प्रकल्प सिद्धी उपक्रमामुळे उत्तम प्रतिसाद; आतापर्यंत १ लाख १८ हजाराहून अधिक महिलांनी केले अर्ज...
पिंपरी, दि. ३० जुलै २०२४ – राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आघाडीवर असून आतापर्यंत शहरातील १ लाख १८ हजाराहून अधिक महिलांचे अर्ज जमा झाले आहेत. यामध्ये ६२ हजार ८७८ अधिक ऑनलाईन अर्जांचा समावेश असून ५५ हजार ५०८ ऑफलाईन अर्जांचा समावेश आहे. घरोघरी जावून ऑफलाईन अर्ज भरण्यामध्ये प्रकल्प सिद्धी उपक्रमातील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिलांची महत्वाची भूमिका आहे.
महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाच्या मदतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘प्रकल्प सिद्धी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत ३०० महिला सदस्या माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ शहरातील महिला लाभार्थींना मिळावा यासाठी लाभार्थींच्या घरोघरी जावून त्यांना अर्ज भरण्यामध्ये मदत करण्याचे तसेच योजनेबद्दल सविस्तर माहिती देण्याचे कामही करत आहेत.
चिखलीतील रहिवाशी असलेल्या ६२ वर्षीय वर्षा पाटील यांना मुख्यमंत्री - लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरायचा होता. परंतू, सतत पडणाऱ्या पावसामुळे त्यांना घराबाहेर पडणेही शक्य होत नव्हते. पण प्रकल्प सिद्धी उपक्रमाच्या समन्वयिका आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्या सोनाली परदेशी या त्यांच्या घरी पोहोचल्या आणि त्यांनी वर्षा पाटील यांचा अर्ज भरून घेतला. यामुळे ६२ वर्षीय वर्षा पाटील यांना कोठेही जाण्याची गरज पडली नाही तसेच योजनेबद्दल सविस्तर माहितीही मिळाली. महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘प्रकल्प सिद्धी उपक्रमा’च्या मदतीने वर्षा पाटील यांसारख्या असंख्य महिला लाभार्थींनी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज घरबसल्या भरला असून याद्वारे महापालिकेने १ लाख १८ हजार अर्जांचा यशस्वी टप्पा गाठला आहे.
संततधार पाऊस पडत असतानाही प्रकल्प सिद्धी उपक्रमाच्या सदस्या सोनाली परदेशी या चिखली परिसरातील रस्त्यांवरून वाट काढत घरोघरी पोहोचतात. पावसामुळे हातातील कागदपत्रे भिजू नयेत म्हणून एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये सर्व कागदपत्रे सांभाळून ठेवत, मोबाईलची चार्जिंग संपू नये यासाठी पावरबँकचा सहारा घेत प्रत्येक घराघरात जावून मार्गदर्शन करून अर्ज भरून घेणे आणि सर्व ऑफलाईन अर्ज व्यवस्थित सांभाळून ठेवणे सोपी गोष्ट नाही. तरीही सोनाली परदेशी यांच्यासाठी हा रोजचा दिनक्रम आहे.
कोट
संततधार येणाऱ्या पावसामुळे हे काम जरी आव्हानात्मक बनले असले तरी आम्ही थांबू शकत नाही. अनेक कुटुंबे आमच्यावर अवलंबून आहेत. मी माझे काम सकाळी ८ वाजता सुरू करते आणि संध्याकाळपर्यंत घरोघरी जावून अनेकांचे अर्ज भरूनही काहीवेळा लाभार्थी त्यांच्या शंका दूर करण्यासाठी रात्री १० वाजता माझ्याशी संपर्क साधत असतात. तरीही मी प्रत्येक लाभार्थीला हवी असलेली माहिती फोनवरून पुरविते. आपल्यामुळे महिला अर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत याचा आनंद आहे.
- सोनाली परदेशी, महिला आर्थिक विकास महामंडळ सदस्या
चौकट – योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यात पिंपरी चिंचवड महापालिका आघाडीवर
आत्तापर्यंत, पिंपरी चिंचवडकडे राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या तुलनेत लाडकी बहीण योजनेसाठी सर्वाधिक ऑनलाईन अर्ज आलेले आहेत. ६२ हजार ८७८ ऑनलाईन आणि ५५ हजार ५०८ ऑफलाईन असे सुमारे १ लाख १८ हजारपेक्षा जास्त अर्ज महापालिकेस प्राप्त झाले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका सक्रियपणे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे अर्ज भरण्यावर भर देत आहे.
चौकट - योजनेसाठी महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयनिहाय सूक्ष्म नियोजन
- ८ क्षेत्रीय कार्यालयनिहाय १२३ अर्जस्विकृती केंद्रांची स्थापना आणि ८ ऑफलाईन अर्ज ऑनलाईन भरणा केंद्रे
- ३०० महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिलांद्वारे घरोघरी जावून ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया
- विविध ठिकाणांहून प्राप्त झालेले ऑफलाईन अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय १६० डेटा ऑपरेटरर्समध्ये ७४ कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंटची नियुक्ती
- डेटा एन्ट्रीसाठी सुमारे ३६१ आंगणवाडी सेविका कार्यरत
- लोकप्रतिनिधींनी त्यांच्या स्तरावर गोळा केलेल्या ऑफलाईन अर्जांचीही क्षेत्रीय कार्यालयस्तरावर स्विकृती
चौकट – प्रकल्प सिद्धी उपक्रमाची वैशिष्ट्ये
- प्रकल्प सिद्धी उपक्रमात मआविमच्या ३०० महिलांचा समावेश असून त्या लाभार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे अर्ज भरण्यास सहाय्य करतात.
- सर्व ऑनलाइन फॉर्म भरण्याचे काम स्मार्टफोनद्वारे केले जात असून या कामासाठी महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
- या महिलांनी यापूर्वी २०२३ आणि २०२४ मध्ये महापालिकेसाठी घरोघरी मालमत्ता कर बिलांचे वितरण केले आहे
कोट
‘प्रकल्प सिद्धी’च्या महिला सदस्या पिंपरी चिंचवड शहरात राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचा कणा आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही या महिला बांधिलकीने काम करतात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेपासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची काळजी त्या घेत आहेत. महापालिकेने आतापर्यंत गाठलेल्या या टप्प्याचे श्रेय महिला विकास महामंडळाच्या महिला, विभागीय समन्वयिका, आंगणवाडी सेविका आणि इतर योगदानकर्त्यांना जाते. हा टप्पा गाठण्यात त्यांचे सामूहिक प्रयत्न आणि वचनबद्धता महत्त्वपूर्ण ठरली असून त्यासाठी त्यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.