पिंपरी, ३० जुलै २०२४ – येत्या गुरुवारी १ ऑगस्टनंतर पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांनी विशेषतः नदीकाठच्या रहिवाश्यांनी सतर्क राहावे, असा इशारा महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिला आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास ती हाताळण्यासाठी महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवा, असे निर्देश आयुक्त सिंह यांनी महापालिका प्रशासनाला दिले.
संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांनी विविध विभागांची आज आढावा बैठक घेतली. या बैठकीस या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, रामदास तांबे, सहशहर अभियंता बाबासाहेब गलबले, डॉ. ज्ञानदेव झुंजारे, संजय कुलकर्णी, मनोज सेठिया, उपआयुक्त मनोज लोणकर, रविकिरण घोडके, अण्णा बोदडे, राजेश आगळे, क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, अमित पंडित, अजिंक्य येळे, उमेश ढाकणे, डॉ. अंकुश जाधव, सिताराम बहुरे, किशोर ननावरे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह आपत्कालीन यंत्रणेशी संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
धरण क्षेत्रात आणि नदीपात्रात अधिक पाऊस पडल्यानंतर पाणी पातळीत वाढ होते. पर्यायाने नदीकाठच्या घरामध्ये पाणी शिरण्याचे प्रसंग उद्भवतात. पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या नद्यांवर असलेल्या धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाली असून ते पूर्ण भरण्याच्या स्थितीत आहेत. अशावेळी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून नदीच्या पाण्याने धोका पातळी ओलांडण्यापूर्वी नदीकाठच्या रहिवाश्यांना त्याबाबत ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना देण्यासाठी संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी व्यवस्था करावी, असे आयुक्त शेखर सिंह म्हणाले. पूरबाधित नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केल्यानंतर तेथे त्यांना आवश्यक सुविधा, भोजन तसेच वैद्यकीय सेवा आदी बाबींचे नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहितीही सिंह यांनी यावेळी दिली. शहरात ज्या ठिकाणी गाळ अथवा कचरा साचण्याची शक्यता आहे अशा ठिकाणांची पाहणी करून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश आयुक्त सिंह यांनी संबंधित विभागांना दिले. शहरातील नदीकाठी असणाऱ्या वस्त्यांमध्ये महानगरपालिकेच्या पथकाने विशेषतः रात्रपाळीमध्ये नेमलेल्या पथकाने या परिसरात गस्त घालून बारकाईने लक्ष ठेवावे, अशी सूचना देखील त्यांनी दिली.
निवारा केंद्राचे व्यवस्थापन करण्यासाठी ‘अ’ व ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयासाठी उपआयुक्त निलेश भदाणे तर ‘क’ व ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयासाठी उप आयुक्त रविकिरण घोडके यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ‘ब’ व ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयासाठी उप आयुक्त संदीप खोत यांची तर ‘ड’ व ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयासाठी सहायक आयुक्त तानाजी नरळे यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
पूरस्थिती निर्माण झाल्यास बचावकार्यासाठी लष्कर (बी.इ.जी.अँड सी., औध मिलिटरी स्टेशन) आणि एनडीआरएफ यांच्याशी समन्वय साधून परिस्थिती हाताळण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महापालिकेची अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून रेस्क्यूसाठी आवश्यक त्या सर्व साधनसामग्रीसह घटनास्थळावर पोहोचण्यासाठी २४ X ७ (२४ तास ७ दिवस) दल सज्ज ठेवण्यात आले, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी दिली. कोणतीही आपत्ती उद्भवल्यास महापालिकेच्या अग्निशमन मुख्य नियंत्रण कक्षाच्या ९९२२५०१४७५ किंवा ०२०- २७४२३३३३ तसेच मध्यवर्ती नियंत्रण कक्षाच्या ०२०- ६७३३११११ या क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच नागरिकांनी महापालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करून प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
माहिती व जनसंपर्क विभाग
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.